कर्मयोगी- निळू फुले

0
303

आकाशात रात्रीच्या वेळी अगणित तारे चमकत असतात.. त्यातले काही विलोभनीय तारे आपलं लक्ष वेधून घेतात.. एक सात्विक आनंद देतात.. चित्रपटसृष्टी ही अशीच चमचमणारी.. झगमगणारी.. डोळे दिपवून टाकणारी सृष्टी.. इथं तारे येतात.. चमकतात.. आणि केव्हा लुप्त होतात हे जाणवून देखील येत नाही.. पण यातलेच काही तारे मात्र ध्रुवा सारखं आपलं स्थान अढळ करतात.. आणि सदैव प्रकाशमान राहतात.. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनमानसांवर कायमचा उमटवून जातात.. असाच आपल्या अभिनयाने सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारा आणि आपल्या भावस्पर्शी अभिनयातून कलात्मकतेचे शिंपण करीत कलाक्षेत्रावर चिरंतन मुद्रा उमटवणारा अढळ ध्रुव तारा.. निळू फुले..

निळू फुलेंचा जन्म १९३१चा.. बालपण पुण्यातल्या खडकमाळ आळीत गेलं.. अकरा भावंडं.. आई-वडील लहान मुलं मिळून तसा बराच मोठा परिवार.. सारे प्रेम आणि आपुलकीने राहत असत.. लहानपणापासूनच त्यांच्या स्वभाव मिश्कील, चेष्टेखोर.. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच त्यामुळे मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून माळी कामाचा कोर्स पूर्ण केला.. पुण्याच्या आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये माळी कामाची नोकरी केली.. याच काळात बऱ्याच पुस्तकांचं वाचन आणि जुने-नवे इंग्रजी सहित अनेकविध भाषांतील चित्रपट पाहून त्यांनी अभिनयकौशल्याचे धडे गिरवले..

याच काळात राष्ट्र सेवा दलाशी संपर्क आला.. तेथे घेतलेला समाजनिष्ठेचा आणि समाजवादाचा वसा त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत सोडला नाही.. सेवादलाचे कलापथक हे तर समतेच्या विचारांच्या प्रसारासाठी उभी केलेली जीवनशिक्षणाची शाळाच होती.. वसंत बापट, पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेली नाटकं, वग, गाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रतिभेला झपाटलेपणाचा दर्प दिला तो राम नगरकर, निळू फुले यांसारख्या हरहुन्नरी कलाकारांनीच..

‘पुढारी पाहिजे’ मधल्या पु.लं.च्या ‘रोंग्या’ला आणि माडगुळकरांच्या ‘बिन बियांचं झाड’ला बहार आणली ती निळू फुले यांनीच.. सेवा दलाचे कलापथक निळू फुलेंच्या मार्गदर्शनाखाली बहरत गेले.. त्यांच्या अभिनयाची कमान उंचावतच गेली.. स्वाभाविकपणे व्यावसायिक रंगभूमीने हा हिरा हेरला.. आणि ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातून त्यांचे रंगभूमीवर विक्रमी पदार्पण झाले.. व्यावसायिक रंगभूमीने निळूभाऊंना उदंड कीर्ती मिळवून दिली.. निळू फुलेंनी विजय तेंडूलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’ला अभिनयाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवलं.. काही भूमिका आणि कलाकार याचं घट्ट नातं विणलं जातं.. जसं; हॅम्लेट –मिल गुड, गॅस लाईट –चार्लेस बॉयर, नटसम्राट –डॉ. श्रीराम लागू.. अगदी तसंच सखाराम बाईंडर –निळू फुले.. राजकारण गेलं चुलीत, बेबी, मास्तर एके मास्तर अश्या विविध नाटकांतून त्यांचे अभिनय कौशल्य प्रकट होते.. रंगमंचाचा अवकाश व्यापून उरणारा घुमारेदार खर्ज, संवादातील नेमकं टायमिंग.. व्यक्तिरेखेची आतून उमज आणि ती व्यक्त करणारी देहबोली.. हि अभिनयाची अस्त्र वापरून निळू भाऊंनी मराठी रंगभूमीला समृध्द केलं..

काही कलाकारांच्या अभिनयातली सहजता पहिली कि वाटतं, परमेश्वरानं त्यांना याच कामासाठी धरतीवर पाठवलं आहे.. अश्या अभिजात कलाकारांपैकी एक निळू फुले.. कधी खलनायक, कधी नायक, कधी हास्यनायक तर कधी हे सगळं एकमेकांत मिसळून निळू फुलेंनी अभिनयाचं एक पर्व आपल्या नावे केलं..

चित्रपटसृष्टीतल्या पदार्पणातच ‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपटातल्या ग्रामीण जीवनाचा प्रतिनिधी ‘झेले आण्णा’ यशाची सर्व शिखरं पार करून गेला.. रांगड्या पद्धतीने अन्यायाचा प्रतिकार करणारा शोषित, दलित त्यांनी साकारला ‘शापित’ मध्ये.. ‘पिंजरा’ मध्ये देखील नैतिक अधःपतनातून स्वतःहून ओढवून घेतलेल्या शोषणाची खंत, अगतिकता, आणि ओशाळ हास्यातून मांडू शकतात ते केवळ निळू फुलेच.. निर्विवाद, कर्तबदार, चतुर, धारदार भाव, अधिकारयुक्त आवाजरुपी हिंदुराव धोंडे पाटील म्हणजे निळू भाऊ आणि नैतिक अधिष्ठान असणारा मास्तर म्हणजे डॉ. श्रीराम लागू.. या दोन नटवर्यांनी ‘सामना’तून प्रेक्षकांची मनं जिंकली.. जातिवंत पत्रकाराच्या भूमिकेत सत्तेच्या राजकारणाचा साक्षीदार साकारला ‘सिंहासन’मधून.. सहकारसम्राट, सगळीकडे बोंबाबोंब, थापाड्या, सासुरवाशीण अश्या अनेक मराठी आणि कुली, सारांश, नरम-गरम, मशाल अश्या काही हिंदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं..

निळू भाऊंकडे अभिनयाची नैसर्गिक ताकद होती. मुद्राभिनय आणि आवाजाभिनय यांचा ताळमेळ साधून कधी नुसती भुवई उंचावून तर कधी तोंडाचा चंबू करून, कधी केवळ नजरेतून, ते दृश्याचा परिणाम निर्माण करायचे.. निळूभाऊंच्या खलनायकीत केवळ ठाशीवपणा नसून दुष्टपणा, लाडीगोडी, लाचारी अश्या विविध छटा असत.. त्यांच्या संवादफेकीचं लोकांना जबरदस्त आकर्षण होतं.. आवाज हा तर निळू भाऊंचा ट्रेडमार्क बनला होता.. चंदेरी दुनियेत ते खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले परंतु वास्तविक जीवनात ते खऱ्या अर्थाने नायक होते.. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांचं जमिनीशी असणारं नातं कधी तुटलं नाही.. माणसाचे विचार जितके प्रगल्भ, गरजा जितक्या कमी आणि राहणी जितकी साधी तितका मनुष्य सुखी, समाधानी आणि समृध्द असतो.. माणसाच्या श्रेष्ठत्वाचे मूल्यमापन; घरदार, पेहराव, राहणीमान यावरून न होता त्याच्या वैचारिक उंचीवरून होते.. हे जणू निळूभाऊ जगले होते..

ईश्वराने दिलेले कलेचे वरदान गोरगरिबांच्या, उपेक्षितांच्या कल्याणासाठी कारणी लावणारा हा कलावंत थोर माणूस होता तो त्याच्या दातृत्वामुळे..

“तुका म्हणे आहे झरा|

आहे मूळचाच खरा”|| असे त्यांचे मन होते..

कित्येकवेळा आपल्या खिशातील पाकीट काढून देण्यापासून नाटकाच्या माध्यमातून ‘कृतज्ञता निधी’ गोळा करण्यापर्यंतचे दातृत्व चिरंतन स्मरणात राहील.. सध्याच्या काळात प्रसिद्धीसाठी आणि नावाच्या पाट्या लावण्यासाठी केलेल्या स्वार्थी दानापासून ते कोसो दूर राहिले.. जे दिलं त्याबद्दल बोलायचं नाही आणि जे देणार आहे त्याचं श्रेय मागायचं नाही, हेच खरे दातृत्व..

एक कलावंत असूनही त्यांच्यातील सामाजिक जाणीव प्रगल्भ होत्या.. डॉ. लोहियांच्या समाजवादी विचारांचा पगडा होता.. आणि महात्मा फुले हे प्रेरणास्थान.. जातीविरोधी लढा असो, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ की, नर्मदा बचाव आंदोलन.. कोणत्याही मंचावर परखडपणे विचार मांडणारे ते दिशादर्शक विचारवंत होते.. तत्वनिष्ठ वैचारिक भूमिका त्यांनी अखेरपर्यंत सोडली नाही..

सरतेशेवटी मला निळूभाऊंच्या लाभलेल्या सानिध्याविषयी सांगावेसे वाटते आहे.. १५ जुलै २००१चा तो दिवस.. थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नावाने गावातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या सभागृहाच्या उद्घाटन निमित्ताने माझ्या छोट्याश्या वाडीला त्यांचे सानिध्य लाभले.. आपला लाडका अभिनेता येणार म्हणून गावकऱ्यांनी गुढ्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या, ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली.. गावाचे वातावरण उत्साहाने भारावलेले होते.. निळूभाऊंना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी गावोगावच्या लोकांची झुंबड उडाली होती.. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत चित्रपटांतल्या संवादाच्या माध्यमातून आणि समतेच्या विचारातून लोकांना मंत्रमुग्ध केले.. या मोठ्या माणसाच्या सानिध्यात चार क्षण घालवता आले हेच सद्भाग्य.. कारण सामान्य माणसांचे चेहरे वाचून निर्मळ हास्याद्वारे माणुसकीचा ओलावा जपणारे निळूभाऊ.. खेड्यातल्या छोट्याश्या घरात बशीने चहा पिणारे निळूभाऊ.. नव्वद वर्षाच्या आजीजवळ जमिनीवर बसून विचारपूस करणारे निळूभाऊ.. माझ्या पाठीवर थाप मारून ‘खूप मोठी हो’ असा आशीर्वाद देणारे निळूभाऊ.. मी त्या दिवशी ‘याची देही याची डोळा’ अनुभवले.. त्या क्षणांची भेट हा मला अनंतकाळचा ठेवा वाटतो..

सामाजिक भान जपणाऱ्या या सुसंस्कृत कलावंताने स्वतःच्या वर्तनाने कला क्षेत्रात नवीन आदर्श निर्माण केला. कदाचित म्हणूनच त्यांचे जाणे कमालीचे व्यथित करणारे ठरले.. एक व्यक्ती, कलाकार, कार्यकर्ता म्हणून मुक्तपणे संचार करणाऱ्या या प्रवासी पक्ष्याने अखेर १३ जुलै २००९ या दिवशी आपले पंख नेहमीसाठी मिटले..

निळूभाऊ म्हणायचे, “जे काम करावसं वाटतं, ज्यातून आनंद मिळतो तेच काम करावं.. पैसा प्रसिद्धी मिळविण्यासाठी आवड नसलेलं काम केल्यास जीवनातला आनंद गमावून बसाल..” आजच्या तरुणाई साठी यापेक्षा चांगला संदेश असूच शकत नाही..!!

-डॉ. वर्षा खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here